बृहनमुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय सील करणार... आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबईत तर कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे.



मुंबई (प्रतिनिधी): देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबईत तर कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन कर्मचाऱ्यांची टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोघांवर उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय सील करण्याचे काम सुरु आहे.


डॉक्टर आणि पोलिसांनंतर पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात


कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे आघाडीवर आहेत. त्याच बरोबर पत्रकारही प्रत्यक्ष फिल्डवर राहून घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आत्तापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे.


मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पत्रकारांची काही दिवसांपूर्वी Covid-19 चाचणी घेण्यात आली. त्यात 167 पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती. त्यातल्या 53 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. या सगळ्यांनाच कुठलीही लक्षणं नव्हती. ही सर्व मंडळी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारी आहेत. सगळ्यांवर आता उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे.


दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्या 4483 वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे सर्वात जास्त 2724 रुग्ण मुंबईत आहेत. त्यात सोमवारी 187 रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात 283 रुग्णांची नोंद झाली आहे.