एसटी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी भंगार बसचं 'सॅनेटायझर मशीन'मध्ये केलं रुपातंर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सॅनिटायझर मशीनचा वापर केला जात आहे.



मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या टायझर मशीनचा वापर केला जात आहे. तंत्रज्ञान वापरून या मशीन तयार केल्या जात आहेत. पण एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र एक वेगळीच मशीन तयार केली आहे आणि तीही भंगारातल्या सामानातून.


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीने सॅनेटायझर मशीन तयार केली आहे. इतर मशीन या वेगवेगळे भाग, लोकांची घर, वस्त्या, टॉयलेट निर्जंतुकीकरण्यासाठी वापरल्या जात आहे. पण एसटी वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी भंगारात पडलेल्या सामानातून हे मशीन तयार केलं आहे. खरंतर ही मशीन म्हणजे एक बसच आहे. या बसमधील सगळी आसनं काढून टाकण्यात आली आहेत. बसच्या मोकळ्या भागात खिडक्यांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे द्रव्य सोडणारे फवारे लावण्यात आले आहेत. बसच्या मागच्या दारातून एखादी व्यक्ती आज शिरली की तिच्यावर हे निर्जंतुक करणारे द्रव्य सोडले जाते. त्या व्यक्तीच्या अंगावरील वस्तूंसह ती व्यक्ती निर्जंतूक होऊन पुढल्या दाराने बाहेर पडते. मुख्य म्हणजे अशा दोन बस या अवघ्या काही तासात कुठल्याही खर्चाशिवाय तयार करण्यात आल्या आहे.


सध्या प्राथमिक स्तरावर एसटीचे कर्मचारी या बसचा वापर करत आहेत. गरज भासल्यास हे चालते-फिरते सॅनेटायझर  मशीन इतर भागातही पाठवले जाऊ शकते. परंतु सध्या केवळ प्रायोगिक तत्वावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भंगारात पडलेल्या बसचा अशा पद्धतीने वापर केला आहे.


सध्या मोठ्या प्रमाणावर अशा बस तयार करण्याचा विचार नाही. किमान त्या भागात काम करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तरी त्यामुळे निर्जंतुकीकरण होत आहे. सध्या एमएमआर रिझन सोडून राज्यातील इतर कुठल्याही भागात एसटी महामंडळ आपली सेवा देत नाही आहेत. एमएमआर रिझनमध्ये सध्या एसटीच्या सुमारे 600 ते 700 रोज होत आहेत. या फेर्‍यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कर्मचारी अशा तब्बल 26 ते 27 हजार कर्मचाऱ्यांची ने-आण एसटी महामंडळाच्या वतीने केली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर भागातील महापालिका किंवा जिल्हा कार्यालयांनी बस मागितल्या तर त्याचा पुरवठा आम्ही करतो, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.